पैठण ,दि.२१.( अभिजीत सोनवणे )
गेल्या काही दिवसांपासून थंडीत अचानक वाढ झाल्याने पारा झपाट्याने घसरू लागला आहे. वाढत्या थंडीमुळे ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांना त्रास जाणवू लागला असून थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
थंडीची लाट येताच बाजारपेठांमध्ये स्वेटर, जॅकेट, कानटोपी आणि इतर उबदार कपड्यांसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गरम कपड्यांना मोठी मागणी असून वाढत्या मागणीमुळे स्वेटर व इतर ऊनी कपड्यांच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच युवक वर्ग आता थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांवर अवलंबून आहेत. मुख्य रस्त्यांलगत, रेडीमेड कपड्यांच्या दुकानांमध्ये तसेच फेरीवाल्यांकडे स्वेटर-जॅकेटच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे दुकानदारांचाही कल गरम कपड्यांच्या विक्रीकडे वाढताना दिसत आहे.
दरम्यान, वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळे सायंकाळी ७ नंतर रस्त्यांवर लोकांची वर्दळ कमी होत असून अनेक भाग निर्मनुष्य दिसू लागले आहेत. थंडीमुळे दवाखान्यांमध्येही रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र आहे.




















