कोपरगाव, दि.१५ ( दिलीप गायकवाड )
गोदावरी नदीवरील नव्याने उभारण्यात येत असलेला पूल अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. या पूलाच्या दोन्ही टोकांवरचा रस्ता अपूर्ण असल्यामुळे सध्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाच्या सध्याच्या हंगामात पूलाभोवती भरलेली माती व मुरूम वाहून गेली असून रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी, या मार्गावरून ये-जा करणे धोकादायक झाले आहे.

सदर पूल हा बेट ते साईबाबा मंदिर कॉर्नर या मार्गावर स्थित असून गोदावरी नदीवरील ब्रिजचा मुख्य भाग पूर्ण झाला असला, तरी त्याचे टोक अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे हा पूल पूर्णतः वाहतुकीस खुला करण्यात आलेला नाही. सध्या साई कॉर्नर ते पुणतांबा फाटा हा मार्ग नेहमीप्रमाणेच खराब स्थितीत असून नागरिकांना अडचणींचा सामना करावालागत आहे.
बेट नाका पासून पर्यायी रस्त्यांचा वापर होत असला, तरी या रस्त्यांची स्थिती फारच खराब आहे. काही ठिकाणी पावसामुळे माती व मुरूम वाहून गेले असून रस्ते खचले आहेत. अनेक ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत, ज्यामुळे अपघाताची शक्यता कायम आहे.
पूलाच्या उत्तर टोकाकडे माती व मुरूम भरून रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु अवघ्या दोन दिवसांच्या पावसात हे भराव वाहून गेले आहेत. जे.सी.बी.च्या साहाय्याने या भागात पुन्हा मुरूम टाकण्यात आली असली, तरी या अपूर्ण आणि मातीच्या भरावावर किती विश्वास ठेवावा याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे.
पावसाळ्यापूर्वी पूल पूर्ण होण्याचे आश्वासन देणाऱ्या ठेकेदाराकडे नागरिकांचा रोष वाढला आहे. “हा पूल वेळेत का पूर्ण झाला नाही?”, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत असून, ठेकेदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे सदर ठिकाणी पाहणी केल्याने दिसून आले आहे.




















