मुंबई, दि. २५ : मंगेश म्हात्रे
मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री तथा कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने म्हाडा जनसुनावणी दरबाराचे आयोजन आज वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात आले. शिवडी, वरळी, भायखळा, मलबार हिल आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील ५६ अर्जदारांच्या तक्रारींवर प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आली.
अर्जदारांचे म्हणणे शांतपणे ऐकून तक्रारींचे तत्काळ व सकारात्मक निराकरण करण्याचे स्पष्ट निर्देश लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अनेक अर्जदारांच्या प्रलंबित प्रकरणांवर जागेवरच कार्यवाही करण्यात आली.
दरबारात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, आर आर मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ यांच्यासह उपमुख्य अभियंते, कार्यकारी अभियंते, मिळकत व्यवस्थापक आदी अधिकारी उपस्थित होते.
सुनावणीत आलेल्या प्रमुख तक्रारींमध्ये : उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीचे प्रश्न, पुनर्विकासासाठी ना-हरकत प्रमाणपत्र,भाडेकरू–रहिवाशांची पात्रता निश्चिती,संक्रमण शिबिरातील अडचणी, बीडीडी चाळ पुनर्वसनातील सदनिका वाटप,सदनिका हस्तांतरणाशी संबंधित मुद्दे अशा विविध प्रकरणांचा समावेश होता.
अर्जदारांच्या अडचणी कमी करण्यासाठी प्रशासन संवेदनशीलतेने काम करेल, असा विश्वासही सहपालकमंत्री लोढा यांनी व्यक्त केला.




















