कोपरगाव, दि. १ (दिलीप गायकवाड)
कोपरगाव नगरपरिषदेकडून आठवड्यातून दोन वेळा चार दिवसाआड सोडण्यात येणारे पाणी महामार्गावर वाहून जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एक ते दीड तासासाठी येणारे हे पाणी बेटनाक भागाकडे जाताना पाईप लाईनमध्ये झालेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात महामार्गावर सांडत आहे.

या गळतीमुळे महामार्गावर चिखल, खड्डे आणि साचलेले पाणी तयार होत असून, छोट्या वाहनचालकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याचा पुरवठा मर्यादित असतानाही अशा प्रकारची नासाडी होणे दुर्दैवी असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
कोपरगावमध्ये पाणीटंचाईमुळे आधीच नागरिकांना आठवड्यातून केवळ दोन वेळा पाणी मिळते. त्यातलेही अर्ध्यापेक्षा अधिक पाणी महामार्गावरील गळतीमुळे वाया जात असल्याची तक्रार होत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जड वाहतूक होत असल्यामुळे रस्ता अधिक खराब होत असून, नागरिकांना संपूर्ण दिवस याचा त्रास सहन करावा लागत आहे.
ही गळती तातडीने थांबवून पाणी वाचवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नगरपरिषद प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील काही नागरिकांनी दिला आहे.




















