मुंबई, दि.११ ( प्रतिनिधी )
मुंबईतील दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा जाळ्यांचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच अतिधोकादायक ठिकाणांलगत असलेल्या एसआरए व म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये अशा नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी धोरण तयार करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत.
सह्याद्री अतिथीगृहात कुर्ला मतदारसंघातील समस्यांबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
चुनाभट्टी व चांदीवली भागात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने स्थानिक आमदारांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यानुसार, मुंबईतील सुमारे ४२ झोपडपट्ट्यांमध्ये सुरक्षा जाळ्यांचे काम मदत व पुनर्वसन विभागाच्या निधीतून करण्यात यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
धोकादायक इमारतीतील नागरिकांना प्राधान्याने स्थायी पुनर्वसन देण्यासाठी धोरण तयार करून कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच, कुर्ला येथील तकीया वॉर्डमधील २० एकर जमिनीवरील घरांसाठी क्लस्टर योजना राबविण्याची शिफारसही करण्यात आली.




















