ग्रामपंचायत व नगरपरिषद निवडणुकांची तयारी सुरू
कोपरगाव, दि.१४ ( दिलीप गायकवाड )
कोपरगांव तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत, नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोपरगांव उबाठा शिवसेनेतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा १९ जून २०२५ रोजी कोपरगांव येथील व्यापारी धर्मशाळा येथे होणार असून,
यावेळी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. ही माहिती सह संपर्क प्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली.
झावरे यांनी सांगितले की, “नगरपरिषदेच्या निवडणुकीची तयारी पक्षाच्या रणनीतीनुसार सुरू असून, यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले जाईल. यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील उबाठा सेना जोमाने उतरणार आहे.”
ते पुढे म्हणाले की, “मागील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अनुभवाचा आणि जनतेच्या जीवनावश्यक प्रश्नांचा विचार करता, सध्याची स्थिती निराशाजनक आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता अजूनही माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवते. त्यामुळेच मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा उबाठा सेनेची सत्ता येईल अशी अपेक्षा आहे, आणि राज्यभरात उबाठा सेना आघाडीवर असेल.”
या कार्यकर्ता मेळाव्यात कोपरगांव शहर व तालुक्यातील सर्व उबाठा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
यामध्ये जिल्हा प्रमुख रावसाहेब थेवरे, जिल्हा संघटक कलदिरं सिंग, ज्येष्ठ नेते सुहासराव वहाडणे, तसेच कोपरगाव तालुका अध्यक्ष (पूर्व विभाग) संजय दंडवते, पश्चिम विभाग अध्यक्ष गंगा राहणे, कोपरगाव विधानसभा अध्यक्ष किरण दराडे, शहरप्रमुख सनी वाघ यांचाही सहभाग राहणार आहे.




















