सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा, वंचित बहुजन आघाडी विद्यार्थी संघटनांचा प्रेरणादायी उपक्रम
ठाणे, दि.६ ( अनिकेत मोरे )
सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा, वंचित बहुजन आघाडी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी टीप टॉप प्लाझा येथे फुले-आंबेडकर विचार उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते नव्या पिढीला महापुरुषांच्या विचारांशी जोडणे, करिअरविषयी योग्य दिशा दाखवणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे.

या सोहळ्यात १०वी आणि १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “१०वी, १२वी नंतर पुढे काय?”, “परदेशात शिक्षणाच्या संधी” आणि “मराठी शाळांचे भवितव्य” या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये हेमंत सुटे, सुनील कदम आणि सचिन बनसोडे यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तींनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करत त्यांना विविध क्षेत्रातील पर्याय समजावून सांगितले.

कार्यक्रमात एकूण १६ गुणवंत विद्यार्थ्यांना महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महापुरुषांच्या नावाने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या. हा उपक्रम गुणवत्तेचा गौरव करत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना नव्या युगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय यांनी भूषवले. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि ध्येय निश्चितीचा संदेश दिला. तसेच ठाणे शहर पालघर निरीक्षक सिद्धार्थ जाधव यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करून सामाजिक भान जपणारा आदर्श निर्माण केला.
कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्धपणे पार पडले असून, यामध्ये अनेक तरुण स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. एकूणच हा उपक्रम शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरला.




















