मुंबई, दि. २६ : मंगेश म्हात्रे
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मुख्यालयात आज संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानाला ७६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली.
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मुंबई आर आर बोर्डाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुख्य अभियंते धीरजकुमार पंदिरकर व सुनील ननावरे, सचिव अनिल वानखडे, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड, मुख्य वास्तुविशारद प्रवीण साळुंखे तसेच मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांसह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
भारतीय संविधानाचे महत्व आणि जनजागृती वाढविण्याच्या हेतूने दरवर्षी संविधान दिन साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारलेल्या राज्यघटनेद्वारे देशाला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि समानतेचे अधिकार बहाल झाले. त्याच भावनेतून हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता अभय रामटेके यांनी केले.




















