चेंबूर मध्ये बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी लॉंगमार्च
मुंबई, दि.९ मार्च ( प्रतिनिधी )
बिहारच्या बुद्धगया महाबोधी महाविहार आमच्या हक्काचे असून बुद्धगया आमच्या ताब्यात द्या,१९४९ चा कायदा रद्द करा अश्या विविध मागण्या करत चेंबूर येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने भव्य लाँगमार्च काढण्यात आला.

या लाँगमार्च नंतर समाजबांधव जिल्हाअधिकारी यांना निवेदन सादर करणार.आज रविवार दि.९ मार्च रोजी चेंबूर येथील महात्मा फुले नगर नं.१,पी.एल. लोखंडे मार्ग येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत भव्य लॉंगमार्च काढण्यात आला. या आंदोलनात चेंबूर मधील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय नेते , पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या लॉंगमार्चमध्ये खासदार चंद्रकांत हंडोरे म्हणाले की मंदिरामध्ये हिंदू पुजारी असतात. चर्च मध्ये फादर असतात, मुस्लिमच्या मशीद मध्ये मौलाना असतात, तर बौध्द विहारमध्ये बौद्ध असले पाहिजे.दुर्दैवाने हे होत नाही. याचा निषेध करण्यासाठी तसेच महाबोधी विहार ताब्यात देण्यासाठी आज निषेध रॅली काढण्यात आली आहे.हे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी संसदेत करणार असल्याचे हंडोरे म्हणाले.

या लाँगमार्च मध्ये किसन माने, प्रविण बागुल, शरद शेळके, जयकर मागाडे आणि शंकर बोर्डे आदीसह चेंबूर विभागातील विविध संघटना, पक्ष, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी जोरदार मागणी केली आणि या विषयाकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी आग्रही भूमिका मांडली.




















