मुंबई, दि.१५ ( प्रतिनिधी )
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे की, यावर्षीपासून “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, आता विद्यार्थ्यांना एसटी पास मिळवण्यासाठी आगारात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. एसटीचे मासिक पास थेट त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयातच वितरित केले जाणार आहेत.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, १६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असून, शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारतर्फे ६६.६६ टक्के प्रवास भाड्याची सवलत दिली जाते. त्यामुळे फक्त ३३.३३ टक्के रक्कम भरून मासिक पास मिळवणे शक्य होते. याशिवाय, “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना” अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत पास दिला जातो.
आतापर्यंत विद्यार्थ्यांना एसटी पास मिळवण्यासाठी आगारात जाऊन रांगेत उभं राहावं लागत होतं. मात्र, या नव्या योजनेनुसार, शाळांनी किंवा महाविद्यालयांनी तयार केलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीवरून, एसटी कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वाटप करतील. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल आणि त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागणार नाही.
ही योजना १६ जूनपासून राज्यभरात सुरू करण्यात येत असून, सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आगार व्यवस्थापकांकडून पत्राव्दारे सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी पाससाठी आवश्यक विद्यार्थ्यांची यादी आधीच तयार ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, “ही अभिनव योजना राज्यातील लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना थेट लाभ देणारी ठरेल. शिक्षणाचा वेळ वाचवणे आणि सुविधा घरपोच देणे हाच या योजनेचा मूळ उद्देश आहे.”
या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार असून, शिक्षणाच्या प्रवासात ही सुविधा मैलाचा दगड ठरणार आहे.




















