कोपरगाव : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यातील राखीव वनक्षेत्रात मुरूम, पोयटा आणि दगड माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. समृद्धी महामार्गाच्या विविध कामांसाठी वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेत संवत्सर, सडे बंधारा आणि कोकमठाण परिसरातील वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असल्याची चर्चा आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी जेसीबी, ट्रॅक्टर आणि डंपरच्या सहाय्याने राखीव वनक्षेत्रातून मुरूम, पोयटा व दगड बाहेर काढले जात आहेत. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र संबंधित यंत्रणेकडून या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
गोदावरी नदीलगतच्या राखीव वनक्षेत्रात सुरू असलेल्या या उत्खननामुळे जंगलांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचा इशारा वृक्षमित्र आणि पर्यावरणप्रेमींनी दिला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे मनोबल वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वनसंपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या विभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच जिल्हा उपवनसंरक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करून अवैध उत्खनन आणि तस्करीला तातडीने आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
” तक्रारींनंतरही कारवाईचा अभाव – नागरिक
राखीव वनक्षेत्रातील अवैध उत्खननाबाबत स्थानिक नागरिक, वृक्षमित्र आणि पर्यावरणप्रेमींनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यानंतरही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी विशेष गस्त घालून मुरूम-पोयटा माफियांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



















