मुंबई, दि.१ (प्रतिनिधी )
राज्यात यावर्षी पावसाचे आगमन विलंबाने होत असून, सध्या वातावरणातील बदलांमुळे मॉन्सूनचा प्रवास मंदावला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार किमान १० जूनपर्यंत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या काळात पश्चिम किनारपट्टी व काही निवडक भागांतच हलकासा पाऊस होणार असून, बहुतांश राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.
या कोरड्या हवामानामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, तर मराठवाडा आणि खानदेशात ते ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान राहील. याचा थेट परिणाम पेरणी आणि लागवडीवर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना विशेष आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये. विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी पावसाची खात्री होईपर्यंत थांबावे, अन्यथा बी-बियाण्यांचे आणि मेहनतीचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशाराही कृषी विभागाने दिला आहे.
शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अधिकृत सुचनांकडे लक्ष ठेवावे व पेरणीसाठी योग्य वेळची वाट पाहावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.




















