प्रकाश दुशिंग यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार…
कोपरगाव, दि.७ : दिलीप गायकवाड
कोपरगाव येथील महार समाजाच्या वतन जमिनीवर झालेला फेरफार आणि फसवणुकीमुळे सुमारे शेकडो कुटुंबे बेघर होऊन रस्त्यावर आल्याची गंभीर बाब प्रकाशात आली आहे. या प्रकरणी सकल आंबेडकरी समाज, कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रकाश दुशिंग यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली असून न्याय मिळावा म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या प्रकरणासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या पत्र क्र. कावि/मिन-२२८/इ/228/७०६५९०२/२०२, दि. ८/१०/२०२५ नुसार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात या विषयी बैठक घेण्यात आली होती. बैठकीत प्राप्त कागदपत्रांचे परीक्षण केल्यानंतर मौजे कोपरगाव येथील जुने सर्व्हे क्रमांक ५,६,७,८,९ या मिळकतींचे रूपांतर नविन सि.स.नं. १९३५ अ, मध्ये झाल्याचे आढळून आले.
या पार्श्वभूमीवर उपअधिक्षक (भूमी अभिलेख), कोपरगाव यांना स्थळनिरीक्षण, पंचनामा आणि चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तक्रारदार प्रकाश दुशिंग यांनी सांगितले की, “गावातील मूळ जमिनदारांच्या हक्कांवर गदा आणत काही व्यक्तींनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून जमिनी बळकावल्या. त्यामुळे अनेक मागासवर्गीय कुटुंबांची उपजीविका उद्ध्वस्त झाली आहे.
आम्ही कोणतीही राजकीय बाजू न घेता कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी लढत आहोत.”
प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत त्वरित चौकशीचे आदेश दिले असून तहसिलदारांच्या पत्रानुसार सर्व संबंधित कागदपत्रांसह पंचनामा करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामस्थ आणि तक्रारदार यांची मागणी आहे की:
तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
ज्यांची घरे आणि जमिनी गमावल्या आहेत, त्यांच्यासाठी पुनर्वसनाची तत्काळ तरतूद करावी.
स्थानिक प्रशासन, भुमी अभिलेख विभाग आणि पोलीस यांनी मिळून पीडितांना संरक्षण द्यावे.
उपअधिक्षक (भूमी अभिलेख), कोपरगाव यांनी सूचक चौकशी, सर्व्हे नोंदींचे परीक्षण आणि तांत्रिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्राप्त अहवालानुसार पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे तहसिल कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
या गंभीर प्रकरणाचा पुढील टप्पा म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग व प्रशासकीय चौकशीच्या निष्कर्षावरून पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे. दरम्यान, तक्रारदार प्रकाश दुशिंग आणि ग्रामस्थांनी पुढील आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला असल्याची माहिती बहुजन शक्ती न्यूज’शी बोलतांना दिली.




















