ठाणे, दि. १० : अजय मगरे
आदर्श विकास मंडळ, किसननगर येथील शाळेत आरटीई अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फीच्या कारणावरून त्रास दिला जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. सध्या सहामाही परीक्षा सुरू असूनही शाळा प्रशासन विद्यार्थ्यांना अनावश्यक दडपण आणत असल्याचे पालकांनी सांगितले.
आरटीई (शिक्षणाचा अधिकार) योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांचे शिक्षण मोफत असतानाही फी भरण्याचा आग्रह केला जात असल्याचे आरोप होत आहेत. परीक्षेच्या काळात अशा प्रकारे मानसिक ताण देणे अयोग्य असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
पालकांनी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली असून शाळेच्या मनमानी कारभाराबद्दल कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्याही शाळेला अशा विद्यार्थ्यांकडून फी मागण्याचा अधिकार नाही, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
या प्रकरणी संपर्क साधला असता शाळेचे शिक्षक प्रफुल कदम यांनी स्पष्ट केले की, “आम्ही आरटीईच्या विद्यार्थ्यांकडून शाळेची फी घेत नाही. मात्र ‘ॲक्टिव्हिटी फी’ ही फक्त पालकांच्या संमतीने घेतली जाते. ज्या पालकांना फी भरायची नाही, त्यांच्यावर कोणतीही सक्ती नाही,” असे त्यांनी सांगितले.
तथापि, काही पालकांचे म्हणणे आहे की फीबाबत शाळेकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या बाबीकडे लक्ष देऊन चौकशी करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.




















