गणेशनगर–मेघवाडीतील रहिवाश्यांना ७ दिवसात घरे खाली करण्याची डीआरपीची नोटीस…
मुंबई, दि. २४ : अजय मगरे
धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अनेक नागरिकांना अपात्र केल्यानंतर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाने आणखी काही कुटुंबियांना बेघर करण्याचा विडा उचलला आहे. प्राधिकरणाने जाहीर केलेला ‘की टू की’ प्रकल्प बासनात गुंडाळल्याचे समोर आले आहे. धारावीतील गणेशनगर–मेघवाडी परिसरातील ४२ रहिवाशांना ७ दिवसांत घरे रिकामी करण्याचा आदेश देत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नोटीस बजावल्याने परिसरात चिंतेचे व संतापाचे वातावरण आहे. अचानक आलेल्या या नोटीसमुळे धारावीतील नागरिक धास्तावले आहेत.
धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन अद्याप अंतिम झालेला नाही. यानंतरही सरकारकडून धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील विविध भागात जमिनी उपलब्ध करून देत आहे. अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन या जागांवर करण्याचे डीआरपीने ठरवले आहे. त्यानुसार धारावीतील झोपड्यांचा सर्वे करण्यात आला असून काही भागातील रहिवाशांची पात्र अपात्र यादी जाहीर करण्यात येत आहे. हे काम सुरू असतानाच डीआरपीने धारावीतील काही झोपडपट्टीधारकांना बेघर करण्याची नोटीस जारी केली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प की टू की पद्धतीने राबवण्याचा निर्णय डीआरपीने जाहीर केला होता. मात्र या योजनेला धाब्यावर बसवत धारावीकरांना बेघर करण्याचा डाव डीआरपीमार्फत सुरू असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. गणेशनगर–मेघवाडीतील झोपडीधारकांना तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतराची सक्ती करण्यात आली आहे. घरे न खाली केल्यास महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ च्या कलम ३३ व ३८ अन्वये बळाचा वापर करून झोपड्या हटविण्याचा इशारा देण्यात आला आहे. नोटीस मिळताच गणेशनगर–मेघवाडी परिसरात डीआरपीच्या कारभाराविरोधी मोठी चर्चा रंगली आहे. “विकास हवा पण मानवी सन्मानाने; जबरदस्ती नाही,” अशी भूमिका रहिवाश्यांनी घेतली आहे.




















