तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार – संजय भालेराव
मुंबई, दि.२४ : अजय मगरे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या नियोजित बैठकीत बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी गैरहजर राहिल्याने समितीतील पदाधिकार्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.
सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता कुलाबा येथील बेस्ट भवनात ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु महाव्यवस्थापक अचानक अनुपस्थित राहिल्याने उपस्थित मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली.
महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वयक संजय रमेश भालेराव, आरपीआय (आठवले) प्रदेश सचिव प्रदीप कांबळे, भारतीय बौद्ध महासभा, विश्व शांती सामाजिक संस्था, तसेच कामगार नेते सुशांत रुके यांसह अनेक मान्यवर बैठकीत उपस्थित होते.
डॉ. सोनिया सेठी यांची अलीकडेच बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली असून या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. परंतु अशा महत्त्वाच्या दिवशी त्यांच्या गैरहजेरीबद्दल समितीने कडक नाराजी व्यक्त केली.
बैठक सुरू होण्याच्या अगोदर अधिकाऱ्यांनी “मॅडम अर्जंट कामानिमित्त बाहेर गेल्या आहेत, बैठक सहाय्यक जनरल मॅनेजर घेतील,” असे सांगितल्यावर पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी मिळून बैठकीवर बहिष्कार टाकत सभागृह सोडले.
“६ डिसेंबर हा दुखाचा आणि गंभीरतेचा दिवस आहे. अशा आढावा बैठकीत महाव्यवस्थापकांचा गैरहजर राहणे अत्यंत अनादराचे आहे. याबाबत मी थेट मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तक्रार करणार,” असे संजय भालेराव यांनी स्पष्ट केले.




















