पैठण,दि. १४.( अभिजित सोनवणे )
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पैठण तालुक्यातील नांदर येथील विरभद्रा नदीला पूर आला. गावातील रस्ते व नाले तुडुंब भरून वाहू लागले. संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल पाच तास कोसळला. या दरम्यान नांदर महसूल मंडळात २१९ मि.लि. पावसाची नोंद झाली आहे. रात्री दोन वाजता नदीला भरपूर पाणी आल्याने गावातील विविध ठिकाणी नुकसान झाले.

अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नदीला पाणी आल्याने गावकरी व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नदीच्या पाण्यामुळे दावरवाडी, डेरा, नांदर, कौंदर, वडगाव, कुतुबखेडा या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
प्रतिक्रिया – ॲड. किशोर वैद्य, माजी सरपंच नांदर “आमच्या नदीला तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पाणी आले आहे. शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे. मात्र कालच्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.”




















