धुळीत उमटलेल्या पाऊलखुणा’ ग्रंथाचे प्रकाशन सोहळा उत्साहात पार
मुंबई, दि. २८ : अजय मगरे
बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी आजीवन कार्य केलेल्या ऑस्ट्रेलियातील भंते श्रावस्ती धम्मिका यांना “धम्मदूत” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या लिखाणातील प्रसिद्ध ग्रंथ ‘Footprints in the Dust’ च्या मराठी अनुवाद ‘धुळीत उमटलेल्या पाऊलखुणा’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा गोरेगाव (पूर्व) येथील नागरी निवारा परिषद, संकल्प संकुल येथे दि. २५ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून माजी उच्च न्यायालय न्यायमूर्ती आयु. सी. एल. थुल, आ. डॉ. रत्नाकर अहिरे (आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्ते), प्रा. राहुल रवि राव (मुंबई विद्यापीठ) व प्रो. गौतम मोरे (के. जे. सोमैया इंस्टिट्यूट ऑफ धर्म स्टडीज) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी अनुवादक डाॅ. विनोद सा. आर्य यांच्या हस्ते मराठी आवृत्तीचे अनावरण भंते श्रावस्ती धम्मिका यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी “अभिसंबोधी इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिस्ट स्टडिज” व “संबोधी चॅरिटेबल ट्रस्ट” (गोरेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने भंते धम्मिका यांना बौद्ध अध्ययन, पाली संशोधन आणि बुद्ध धम्म प्रसारातील ५१ वर्षांच्या अमूल्य योगदानाबद्दल “धम्मदूत पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
तसेच सी. एल. थुल, डाॅ. रत्नाकर अहिरे, प्रा. राहुल रवि राव व प्रो. गौतम मोरे यांना बौद्ध धम्मासाठी दिलेल्या योगदानाबद्दल “कृतज्ञता पत्र व गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
पुस्तकाच्या आशयावर बोलताना भंते श्रावस्ती धम्मिका म्हणाले, “आज बुद्धाकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत — एक म्हणजे भक्तिभावातून निर्माण झालेला ‘कथांतील बुद्ध’ आणि दुसरा म्हणजे इतिहासातील ‘पाली तिपिटकातील बुद्ध’. पहिला अलौकिक तर दुसरा वास्तववादी. पाली तिपिटकातील बुद्ध आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या उंचावणारे पण तरीही मानवी स्वरूपाचे दर्शन घडवतात.”
भंते धम्मिका यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या संशोधन व लेखन प्रक्रियेबाबतही रोचक चर्चा केली. त्यानंतर सी. एल. थुल यांनी पुस्तकातील विचारांचे आजच्या काळातील सामाजिक संदर्भात विश्लेषण केले, तर डाॅ. रत्नाकर अहिरे यांनी त्यांच्या विशेष प्रेरणादायी शैलीत पुस्तकातील संदेश स्पष्ट केला.
प्रो. गौतम मोरे यांनी पालि भाषेच्या अध्ययनाचे महत्त्व अधोरेखित केले व “अभिसंबोधी” व “संबोधी ट्रस्ट” यांच्या माध्यमातून मोफत पालि प्रशिक्षणाच्या उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. प्रकाश बी. वीर यांनी केले, तर शर्मिला कापसे यांनी आभारप्रदर्शन केले. संबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष किशोरकुमार सूर्यवंशी, सचिव दामोदर गायकवाड, तसेच डाॅ. विनोद आर्य, सचिन रुके, उज्वला वीर व अन्य पदाधिकारी यांच्या प्रयत्नांतून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
समारोप प्रसंगी उपस्थित सर्व श्रोत्यांना ‘धुळीत उमटलेल्या पाऊलखुणा’ या पुस्तकाच्या प्रती भंते श्रावस्ती धम्मिका यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.गोरेगाव व उपनगरातील मोठ्या संख्येने धम्मबंधूंनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.




















