हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल…
“एसआयटी चौकशी करा, संबधित मा. खासदाराला तात्काळ अटक करा; मुख्यमंत्र्यांनी दिलेली क्लिनचिट संतापजनक”
मुंबई/बीड, दि. २९ : अजय मगरे
बीड जिल्ह्यातील कन्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे प्रकरण आत्महत्या नसून संशयास्पद असल्याने एसआयटीची स्थापना करून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, तसेच भाजपाचे माजी खासदार यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बीड जिल्ह्यातील कवडगाव येथे जाऊन डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्यासोबत माजी मंत्री अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, आणि जिल्हाध्यक्ष राहुल सोनावणे उपस्थित होते.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही फोनवरून संपदा मुंडे यांच्या आईसह कुटुंबियांचा संवाद साधला. “घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत; न्याय मिळवण्यासाठी काँग्रेस सरकारवर दबाव आणेल,” असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले, “डॉ. संपदा मुंडे यांच्यावर चुकीच्या कामांसाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यांच्या छळामुळे त्यांनी आत्महत्या केली. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीपूर्वीच त्या खासदाराला क्लिनचिट दिली, हे संतापजनक आहे.”
ते पुढे म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी फलटणच्या बाहेर व्हावी आणि उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करावी. काँग्रेस शांत बसणार नाही. महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेस राज्यभर आंदोलन छेडतील.”
सपकाळ यांनी महिला आयोगावरही टीका केली. “आयोगाने पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचा आवाज ऐकायला हवा होता. पण त्यांनी पोलिसांकडून माहिती घेऊन सारवासारव केली. आयोगाने महिलांच्या अन्यायाविरुद्ध लढा द्यावा, पोलिसांची बाजू घेऊ नये,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “डॉ. संपदा मुंडे ज्या समाजातील आहेत त्या समाजातील एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही. पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचा दबाव झुगारून स्पष्ट भूमिका घ्यावी. काही सामाजिक कार्यकर्त्याही मौन बाळगत आहेत. नारायण गड व भगवान गड यांनी या प्रकरणी पुढाकार घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.”




















