कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले – एकनाथ शिंदे
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाण्यातील उपवन तलाव परिसरात साकारलेले भक्तीस्थळ
ठाणे, दि. ३१ : अजय मगरे
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांसाठी आनंदाचा क्षण — पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवनघाट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५१ फूट उंच भव्य विठ्ठलमूर्तीचे अनावरण शनिवारी संपन्न झाले. या वेळी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवर आणि वारकरी भक्त उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, “आजचा दिवस ठाणेकरांसाठी पवित्र आहे. पंढरपुरातील पांडुरंग आज ठाण्यात अवतरला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त महापूजेपूर्वीच विठुरायाने मला दर्शन दिले. ही ठाणेकरांची पुण्याई आहे.”
ते पुढे म्हणाले, “५१ फूट विठ्ठलमूर्तीची स्थापना ही प्रताप सरनाईक आणि त्यांच्या टीममुळे शक्य झाली. ठाणेकर भाग्यवान आहेत की, पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांना मिळत आहे. ठाण्यातील हा घाट अहिल्यादेवींच्या नावाने उभारला गेला आहे. मिरा-भाईंदर येथे दोन आणि कासारवडवली येथे एक अशा चार ठिकाणी अशा भव्य विठ्ठलमूर्ती उभारल्या जाणार आहेत. तसेच वर्तकनगर येथे भव्य वारकरी भवन उभारले जाणार आहे.”
आपल्या कार्यकाळातील उपक्रमांची आठवण करून देताना शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायम राहील. गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. शंकराचार्यांनी दिलेली ‘काऊ मॅन’ ही पदवी माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.”
भावनिक होत शिंदे म्हणाले, “मी वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलो आहे. लहानपणी आजी-आजोबांसोबत पंढरपूरच्या वारीला जात होतो. आज उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर विठ्ठल भक्त म्हणून येथे आलो आहे.”
ते म्हणाले, “वारकरी दिंड्यांना अनुदान, विमा आणि टोलमुक्ती देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. पंढरपूरमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि मोबाईल सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत तर मिळेलच, पण ज्यांच्या घरात लग्न ठरले आहे, त्या लग्नांचा खर्च शिवसेना उचलणार आहे.”
प्रताप सरनाईक यांनी पूरग्रस्त भागात १०१ गायी दान केल्याबद्दल शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. “इंदुरीकर महाराज समाजाला साध्या, सोप्या भाषेत दिशा देतात. हरिनाम सप्ताहात सहभागी झाल्याने मन शुद्ध होते. ही शिकवण आम्हाला आनंद दिघे साहेबांकडून मिळाली,” असेही त्यांनी नमूद केले.
शेवटी शिंदे म्हणाले, “मी चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन आहे. तुमच्या आशीर्वादाने शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास शक्य झाला. वारकरी संप्रदाय जिथे बोलावतो तिथे मी धावून येतो.”




















