राखीव भूखंडाचा फेरफार अन्यायकारक असल्याचा आरोप….
मुंबई, दि.१७ : मंगेश म्हात्रे
सायन–प्रतिक्षानगर परिसरात प्रस्तावित सहकार भवन प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.पालिकेच्या एफ/उत्तर विभागाच्या हद्दीत असलेला राखीव भुखंड क्र.३ (सी.एस.क्र.४ पार्ट) हा मूळ विकास आराखड्यानुसार किरकोळ बाजार, मच्छी मार्केट, दवाखाना, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन यांसारख्या आवश्यक सार्वजनिक सुविधांसाठी राखून ठेवण्यात आला होता. एक ते दीड लाख लोकवस्ती असलेल्या प्रतिक्षानगर परिसरासाठी या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अलीकडील मंत्रिमंडळ बैठकीत हा भूखंड मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस (मुंबई बँक) ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला. २४ कोटी २३ लाख किंमतीच्या जागेऐवजी, सध्याच्या शिघ्रगणक बाजारभावानुसार २०३४.५५ चौ.मी. बांधीव चटई क्षेत्र वाणिज्य सुविधांसह म्हाडाला मालकीहक्काने देण्याच्या अटीवर हा भूखंड देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी स्थापन केलेल्या सायन–प्रतिक्षानगर राखीव भूखंड बचाव समिती आणि प्रतिक्षानगर संक्रमण शिबीर पुनर्वसन कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि.१६ नोव्हेंबर रोजी प्रतिक्षा नगरमध्ये काळ्या फिती बांधून शांततामय मुखनिदर्शने केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत सहकार भवनाला ठाम विरोध नोंदवला.
सार्वजनिक सोयींच्या जागेचा गैरवापर करून सहकार भवन उभारणे अन्यायकारक आहे, मूळ विकास आराखड्यातील सुविधा कायम ठेवल्या पाहिजेत,शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा.असे प्रतिक्षानगर राखीव भूखंड बचाव समिती सचिव लवू नर यांनी बहुजन शक्ती न्यूज’शी बोलतांना सांगितले.
सरकारी मंजुरी आणि स्थानिकांचा विरोध यामुळे प्रतिक्षानगर परिसरात या भूखंडाचा मुद्दा चांगलाच पेटणार असल्याचे दिसून येत आहे.




















