अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन
कोपरगाव : दिलीप गायकवाड
अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील शिर्डी बायपास मार्गावर कोकमठाण हद्दीतील हरिसन ब्रँच (तीनचारी) चौफुलीजवळील सिंचन विभागाच्या कालव्याला संरक्षणात्मक कटाडे नसल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी तातडीने दोन्ही बाजूंना कटाडे उभारावेत, अशी मागणी तीनचारी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

महामार्गालगत सिंचन विभागाचा पाठपाणी कालवा असून त्याच्या दोन्ही बाजूंना सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने भरधाव वाहने थेट कालव्यात कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे महामार्गाचे काम करणाऱ्या यादव कन्स्ट्रक्शन कंपनीने त्वरित संरक्षणात्मक कटाडे उभारून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याशिवाय, शामवाडी, कोकमठाण, बारवाचे आळे आणि गणेश बंधारा वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या सिमेंटच्या नळ्या फुटल्याने दुर्गंधी पसरत असून त्याचीही तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महामार्गालगत असलेली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील ऐतिहासिक बारवही दुर्लक्षित अवस्थेत आहे. पावसाळ्यात या बारवात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने सुरक्षेअभावी वाहन बारवात पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते गोकुळ नेहे, सचिन लोखंडे, महेश दहिवाड, राजेंद्र बिडवे, विलास रक्ताडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.




















