ठाणे, दि.२२ : अजय मगरे
ठाण्यातील दोन वर्षांचा हमदान मोहम्मद राबोडी येथील गटारात कोसळून गंभीर जखमी झाला होता. अतिदक्ष उपचारांमुळे त्याचा जीव वाचल्यानंतर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यूपिटर रुग्णालयात भेट देऊन हमदानची तब्येत विचारली. कुटुंबियांनी साश्रूनयनांनी शिंदे यांचे आभार मानले.
राबोडी परिसरातील हमदान हा खेळता खेळता २५ फूट खोल गटारात पडला होता. स्थानिकांनी आरडाओरडा करून मदत मागितल्यानंतर माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले–जाधव यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह त्याला बाहेर काढले. गटारातील दूषित पाणी नाका–तोंडात गेल्याने हमदान गंभीर अवस्थेत होता.
स्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच रेपाळे व जाधव–भोसले यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना माहिती दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता हमदानला ज्यूपिटर रुग्णालयात स्थलांतरित करण्याचे आदेश दिले व डॉक्टरांना तत्काळ उपचारांची सूचना केली.
वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे हमदानची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून न्यूमोनियाही आटोक्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. “आमच्या मुलाचा जीव वाचला, ही आमच्यासाठी नवीन जन्मासारखीच बाब आहे” असे म्हणत हमदानच्या पालकांनी उपमुख्यमंत्री शिंदे, विकास रेपाळे आणि नम्रता भोसले-जाधव यांचे मनापासून आभार मानले.




















