आगामी निवडणुकीत संघटनात्मक बळकटीची अपेक्षा, मात्र अंतर्गत गटबाजीचं मोठं आव्हान
मुंबई, दि. ८ : मंगेश म्हात्रे
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटनात्मक फेरबदल करत सायन कोळीवाडा विभागाध्यक्षपदी संजय भोगले तर वार्ड क्र. १७३ व १७६ च्या उपविभागप्रमुखपदी विलास अपराध यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांमुळे स्थानिक मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून, पक्षात नवचैतन्याचे वारे वाहू लागले आहेत.
तथापि, या दोन्ही पदाधिकाऱ्यांसमोर अंतर्गत गटबाजीचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. संघटनेत एकजूट निर्माण करून आगामी निवडणुकीत मनसेचा झेंडा फडकवण्याचं आव्हान भोगले आणि अपराध यांच्यासमोर आहे.
निष्ठेचं फळ मिळालं
२०१४ नंतर अनेक महत्वाचे पदाधिकारी पक्ष सोडून गेले असताना संजय भोगले यांनी मनसेशी निष्ठा कायम ठेवली. सत्तासंघर्षाच्या काळातही त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र ठेवत पक्ष मजबूत करण्याचं काम केलं. २०२४ विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सत्तेचा रस्सीखेच सुरू असताना भोगले यांनी कोणत्याही भीतीशिवाय निवडणुकीत मनसेतुन उमेदवारी स्वीकारून लढवली.
विलास अपराध यांनी देखील २०१२ नंतर स्थानिक पातळीवर पक्षाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. स्थानिक पातळीवर आधार न मिळूनही त्यांनी ‘स्वराज प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय उपक्रम राबवले. कोणतंही पद नसताना कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचं काम अपराध यांनी संयमाने केलं. मागील १३ वर्षांत दुर्लक्षित राहूनही त्यांनी मनसेप्रती आपली निष्ठा अबाधित ठेवली.
संघर्षाच्या काळात शिलेदार ठरले
सायन प्रतीक्षा नगर परिसरात मनसेची स्थिती डळमळीत असताना माजी शाखाध्यक्ष शंकर कविलकर यांनी संघटना जिवंत ठेवली. तर लवू नर आणि विलास अपराध यांनी आंदोलनं आणि स्थानिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मनसेचं अस्तित्व टिकवण्यासाठी पुढाकार घेतला.
घरभेद्यांमुळे वाढली दरी
पक्षातील काही घरभेद्यांमुळे संघटनेत दरी वाढत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. “तो तसा बोलला”, “त्याने असं सांगितलं” अशा कुचाळक्यांमुळे वातावरण दूषित केलं जात असल्याचं आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. पद टिकवण्यासाठी आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी काहीजण वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करत असल्याने मनसेत गटबाजी वाढल्याचं स्पष्ट होतं आहे.
या पार्श्वभूमीवर भोगले आणि अपराध यांनी पारदर्शक आणि समन्वयात्मक नेतृत्व करत संघटनेतील अंतर्गत गटबाजी रोखणे हेच आगामी काळातील त्यांचं मोठं आव्हान ठरणार असल्याचं राजकीय निरीक्षकांचे मत आहे.




















