मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश…
मुंबई, दि.३० : अजय मगरे
राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील वाढता मृत्यूदर रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना हाती घ्याव्यात, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयातील मृत्यूदराच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, संचालक डॉ. अजय चंदनवाले, तसेच जे.जे. व सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले की, “शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवेत त्वरित सुधारणा घडवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, निधी आणि आधुनिक उपकरणांची उपलब्धता प्राधान्याने सुनिश्चित करावी. अतिदक्षता विभागातील (ICU) खाटांची संख्या वाढविणे, आवश्यक औषधे व साधनसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच दीर्घकालीन सुधारणा आराखडा तयार करणे हे वेळेचे अत्यावश्यक आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “अनेक रुग्ण खासगी रुग्णालयांतून शेवटच्या टप्प्यात शासकीय रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे ICU विभागातील मृत्यूदर तुलनेने अधिक दिसत असला तरी, २०२२ ते २०२५ या कालावधीत एकूण मृत्यूदरात सातत्याने घट झाली आहे. २०२२ मध्ये २०४० रुग्ण उपचारानंतर घरी परतले होते, तर २०२५ मध्ये हा आकडा ७४०७ वर पोहोचला आहे.”
वैद्यकीय शिक्षण विभागाने यासंदर्भात पारदर्शक चौकशी आणि मजबुत सुधारणा आराखडा तयार केला असून, रुग्णालयातील सेवा गुणवत्ता वाढवण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत असल्याचेही त्यांनी Tu सांगितले.




















