कोपरगाव, दि.३१ : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यातील अहिल्यानगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावर धुळे एस.टी. डेपोची अशोक लेलँड कंपनीची बस (धुळे–पुणे मार्ग) दि. २८ पासून बंद पडलेली असून, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

धुळे डेपोचे चालक दिलीप चव्हाण यांनी सांगितले की, ही बस दररोज पुणे–धुळे असा सुमारे ८०० ते ९०० किमी प्रवास करते. मात्र, रस्त्याची दयनीय अवस्था आणि बसच्या सॉफ्टवेअर तसेच बॅटरिंग सिस्टममध्ये बिघाड झाल्याने ही बस तीन दिवसांपासून महामार्गाच्या कडेला उभी आहे.
या बसची देखभाल करणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या मॅकेनिकल टीमने घटनास्थळी येऊन पाहणी केली असून, आवश्यक पार्ट्स नाशिक येथून मागवण्यात आले आहेत. तथापि, पार्ट्स वेळेवर उपलब्ध न झाल्याने दुरुस्तीला विलंब होत आहे. दरम्यान, प्रवाशांसाठी पर्यायी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे चालकाने सांगितले.
राज्य परिवहन महामंडळाच्या ‘ बस ‘ विषयी अनेकदा प्रवासी आणि चालकांकडून तक्रारी येत असतात. या कंपनीच्या गाड्या काही वर्षातच वारंवार बंद पडत असल्याची बाबही समोर आली आहे.
यासंदर्भात बहुजन शक्ती सामाजिक संस्थेने, राज्य परिवहन महामंडळ तसेच महाराष्ट्र शासनाने या बसांच्या गुणवत्तेबाबत चौकशी करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.




















