डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी घेतली गंभीर दखल; चौकशी अहवाल वेळेत दाखल करण्याचे आदेश
मुंबई, दि. ३१ : अजय मगरे
फलटण तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून, सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील दोन वर्षांचा विशाखा समितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणातील चार्जशीट वेळेत दाखल करावी, असेही आदेश त्यांनी दिले.
या प्रकरणाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आयुक्त आरोग्य सेवा डॉ. कादंबरी बलकवडे, आयुक्त सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर प्रत्यक्ष उपस्थित होते. तर सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज कर्पे, फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ, पुणे विभाग आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. पवार यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यांसह विविध महिला प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होत्या.
फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी होत्या आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांशी चांगले संबंध होते. त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नव्हती. पोस्टमार्टम विभागात कार्यरत दोन महिला डॉक्टरांनीही त्यांच्या जबाबात कोणताही दबाव नसल्याचे नमूद केले आहे. रुग्णालयात सुमारे ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले की, पोलीस विभागाने काही अहवाल रुग्णालयाला सादर केला असून, समितीने त्यावर चौकशी केली आहे. मात्र, कोणतीही विभागीय चौकशी झालेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी निर्देश दिले की, सातारा जिल्हा रुग्णालयाने आपल्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांचा दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल तयार करून सादर करावा. तसेच तपासात कोणतीही ढिलाई होऊ नये आणि संबंधितांना न्याय मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
तसेच पोलीस विभागाने निराधार माहितीचा प्रसार थांबवण्यासाठी अधिकृत बुलेटिनच्या माध्यमातूनच माहिती प्रसिद्ध करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
डॉ. गोऱ्हे यांनी पुढे सांगितले की, विशाखा समितीच्या कार्यपद्धतीसाठी स्पष्ट एसओपी तयार करावी आणि समितीचा तिमाही अहवाल विधी व न्याय विभागाला सादर करावा. पोस्टमार्टम व प्रसूती विभागातील डॉक्टरांवर ताण निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्या मार्गदर्शनार्थ मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच पोक्सो प्रकरणातील पीडित मुलीसोबत रुग्णालयात असणाऱ्या नातेवाईकाची जेवणाची सोय करावी, तसेच गर्भवती महिलेच्या पतीचेही मार्गदर्शन करण्यात यावे, अशा सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीची शहानिशा करून सकारात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेशही आरोग्य विभागाला देण्यात आले.




















