मुंबई, दि. ९ : अजय मगरे
भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून, त्यातील तब्बल ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. “महाराष्ट्र हे देशाचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’ आहे. भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्राचा आणि विशेषतः महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२५ या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसमध्ये झाले. महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणारे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आर्मस्ट्रॉंग पामे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एसएनडीटी कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव, आणि ‘नॅक’चे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ब्रिटनमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नसताना, भारतरत्न महर्षी कर्वे यांनी १९१६ साली महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज महिला सक्षमीकरण आणि नवकल्पनांचे नवे युग निर्माण झाले आहे.”
ते पुढे म्हणाले, “राज्य शासनाने नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण आखले आहे. तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम शासन आणि विद्यापीठांनी मिळून करावे. प्रत्येक तरुणाच्या मनातील कल्पना हीच नवकल्पनेची बीज आहे आणि आजच्या काळात प्रत्येकालाच नवउद्योजक बनण्याची संधी आहे.”
या कार्यक्रमात महिला उद्योजकांच्या नवकल्पनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनाला भेट देऊन सर्व नवोन्मेषकांचे अभिनंदन केले. यावेळी वैद्यकीय, कृषी आणि वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट तीन स्टार्टअप्सचा सत्कार करण्यात आला तसेच ‘प्री-इन्क्युबेशन सेंटर’चे उद्घाटनही करण्यात आले.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, “राज्यात शिक्षण, कौशल्य आणि नाविन्यता क्षेत्रात वेगाने काम सुरू असून, महाराष्ट्र या क्षेत्रात देशात अग्रस्थानी असेल.” महिलांच्या महत्त्वपूर्ण सहभागाचा उल्लेख करत त्यांनी शासन एसएनडीटी विद्यापीठाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे नमूद केले.
कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांनी ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२५’ बाबत सविस्तर माहिती देत प्रास्ताविक केले.




















