अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांना ऑनलाईन अर्जाचे आवाहन..
मुंबई, दि. २१ : अजय मगरे
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांच्या आर्थिक-सामाजिक प्रगतीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर व उपनगर जिल्हा कार्यालयातर्फे २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज योजनांसाठी महादिशा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (पीएम-एजेएवाय) अंतर्गत ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत असून स्वयंरोजगार वाढवणे, आर्थिक सक्षमीकरण साधणे आणि लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावणे हे या योजनांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून इच्छुकांनी आपले अर्ज https://mpbcdc.maharashtra.gov.in
किंवा https://mahadisha.in
या संकेतस्थळांवरच करावेत. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष कार्यालयात कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्जदारांसाठी आवश्यक पात्रता : अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा, वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे , वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी ३ लाख रुपये असावे. महामंडळ किंवा इतर वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.




















