एसआरएच्या गलथान कारभाराविरोधात वरळीकरांचा सोमवारी जनआक्रोश मोर्चा
मुंबई : मंगेश म्हात्रे
वरळीतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाविरोधात संतप्त झालेल्या रहिवाशांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. बहुजन शक्ती आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता वांद्रे (पूर्व) येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
वरळी नाका परिसरातील प्रेमनगर व सिद्धार्थनगर येथील इंदिरा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था सन २००२-०३ मध्ये स्थापन झाली. त्यावेळी झोपड्या रिकाम्या करून प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली; परंतु त्यानंतर काम रखडतच गेले. परिणामी अनेक रहिवाशी आजही भाड्याच्या घरात राहत असून आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. संबंधित विकासकाने या कालावधीत मासिक भाडे दिले नसल्याचा गंभीर आरोपही रहिवाशांनी केला आहे.
पुनर्विकासात एक इमारत अर्धवट अवस्थेत उभी आहे; उर्वरित बांधकाम कधी पूर्ण होणार, याबाबत कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष आहे. “आमच्या मालकीचे घर नेमके कधी मिळणार?” या मूलभूत प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्यात एसआरए आणि विकासक दोघेही अपयशी ठरत असल्याचा आरोप रहिवाशी करत आहेत.
गेल्या तब्बल २५ वर्षांपासून रखडलेल्या योजनेबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पात्र कुटुंबांना तातडीने हक्काची घरे द्यावीत, या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, योजनेच्या सद्यस्थितीबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याने अखेर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.
रखडलेल्या योजनेत वरिष्ठ पातळीवर वैयक्तिक लक्ष घालून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी व प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, अन्यथा आणखी तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.




















