सायन प्रतीक्षा नगर पुनर्वसनावरून राजकीय वातावरण तापले…..
कृती समितीचा म्हाडाला आंदोलनाचा इशारा…
मुंबई, दि. २९ : मंगेश म्हात्रे
सायन प्रतिक्षानगर येथील म्हाडा संक्रमण शिबिरातील टी-३६, टी-३७, टी-५३ आणि टी-५४ या इमारती ‘धोकादायक’ घोषित करण्यात आल्यानंतर स्थलांतराचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. रहिवाशांनी नोटीस स्विकारण्यास विरोध केल्याने म्हाडाने थेट इमारत रिकामी करण्याबाबतचे फ्लेक्स लावले. यामुळे परिसरात संताप उसळला असून या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच पेटले आहे.
आयआयटी पवईच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर म्हाडाने या इमारती असुरक्षित ठरवल्या आहेत. जीवितहानी होऊ नये म्हणून ‘तात्काळ गाळे रिकामे करा’ असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, स्थलांतर स्थानिक परिसरातच करण्याचा आग्रह रहिवाशी ठामपणे धरून आहेत.
आहे. मात्र, स्थलांतर स्थानिक परिसरातच करण्याचा आग्रह रहिवाशी ठामपणे धरून आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे), मनसे आणि भाजपकडून रहिवाशांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, प्रतिक्षानगर संक्रमण शिबिर पुनर्वसन कृती समिती स्थानिक पातळीवरच पुनर्वसन व्हावे यासाठी सतत पाठपुरावा करत आहे.
स्थानिक ठिकाणी पुनर्वसनाची मागणी – प्रणिता वाघधरे
“२० हजार रुपये भाडे किंवा संक्रमण शिबिरातील तात्पुरते गाळे — हा पर्याय अपुरा आणि अव्यवहार्य आहे. रहिवाशांचे स्थलांतर सायन प्रतिक्षानगर परिसरातच व्हायला हवे,” अशी मागणी माजी नगरसेविका प्रणिता वाघधरे यांनी केली.
लेखी हमी नसताना स्थलांतर नाही – पूजा कांबळे
“म्हाडाने आजपर्यंत एकही बैठक घेतलेली नाही. पुनर्वसनाचा आराखडा, हक्क, सुविधा याबाबत लेखी हमी देण्यात आलेली नाही. रहिवाशांना विश्वासात घेऊनच पुढील प्रक्रिया व्हावी,” अशी ठाम भूमिका पूजा रामदास कांबळे यांनी मांडली.
घराला घर द्या; घुसखोरीचा मुद्दा नको – शिल्पा केळुसकर
“तात्पुरते स्थलांतर असल्यामुळे अपात्र–पात्र, घुसखोरी असे मुद्दे पुढे न आणता घराला घर हीच भूमिका म्हाडाने घ्यावी,” अशी मागणी शिल्पा केळुसकर यांनी व्यक्त केली.
दडपशाही केली तर रस्त्यावर उतरू — लवू नर
“म्हाडाकडून तोंडी आश्वासन मिळाले, परंतु लेखी हमी नाही. जबरदस्तीने स्थलांतर करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही व्यापक आंदोलन करू,” असा इशारा कृती समितीचे सचिव लवू नर यांनी दिला.
सायन प्रतीक्षा नगर पुनर्वसनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, रहिवाशांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.




















