महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचे वितरण समारंभ भव्य उत्साहात पार पडला
मुंबई, दि. १३ : अजय मगरे
महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायम ‘एक नंबर’वर ठेवण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून उद्योजकांना आवश्यक ती सर्व ताकद देण्याची तयारी आहे, अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
२०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांसाठीचे “महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार २०२५” यांचे वितरण डॉ. सामंत यांच्या हस्ते आज मुंबईत संपन्न झाले. या वेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बळगन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंह, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त वैभव वाघमारे तसेच राज्यातील मान्यवर निर्यातदार उपस्थित होते.
डॉ. सामंत म्हणाले की, “राज्याच्या निर्यातीचे गुणोत्तर दहा पटीने वाढवण्यासाठी शासन १२ नवीन औद्योगिक धोरणे आणत आहे. यामध्ये एव्हीजीसी, जीसीसी, बांबू, लेदर, एरोस्पेस आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.” या धोरणांमुळे नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी पुढे सांगितले की, दावोस, जर्मनी आणि जपान दौऱ्यांदरम्यान महाराष्ट्राने विक्रमी गुंतवणूक आकर्षित केली आहे. “दावोसमध्ये पहिल्या वर्षी १.७० लाख कोटी, दुसऱ्या वर्षी ७ लाख कोटी आणि तिसऱ्या वर्षी तब्बल १६ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून, त्यातील ८० टक्के अंमलबजावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशातील आघाडीचे राज्य ठरले आहे,” असे त्यांनी सांगितले.
उद्योगमंत्री सामंत यांनी उद्योजकांना आवाहन केले की, “पुरस्कार स्वीकारताना महाराष्ट्राची सेवा करत आहोत, या भावनेने स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्यावर भर द्या.” जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील उद्योजकांनी नवी मुंबईतील प्रकल्पासाठी रत्नागिरीत पहिले ट्रेनिंग सेंटर सुरू करून स्थानिक तरुणांना ४० हजार रुपयांपर्यंत रोजगार उपलब्ध करून दिल्याचे कौतुकही त्यांनी केले.
स्थानिक रोजगार आणि भूसंपादनाशी निगडित कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर बोलताना डॉ. सामंत म्हणाले की, उद्योजकांनी स्थानिकांचा सहभाग वाढवावा आणि संघटनांनी नेतृत्व घेऊन प्रश्न सोडवावेत. तसेच ‘मैत्री पोर्टल’ आणि ‘मिलाप प्रणाली’च्या माध्यमातून नवीन औद्योगिक धोरणांचा लाभ सर्व उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी विभागाला दिले.
या वेळी डॉ. सामंत यांच्या हस्ते ‘एक्सपोर्ट कन्व्हर्शन बुकलेट’ चे प्रकाशन करण्यात आले. तसेच रत्नागिरी, नागपूर, गडचिरोली आणि लातूर जिल्हाधिकाऱ्यांना निर्यात वृद्धीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली, तर उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना आणि उद्योग सचिव डॉ. अन्बळगन यांनीही आपले विचार मांडले.
महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार सन २०२२-२३ चे विजेते:
सुवर्ण पदक विजेते : अपार इंडस्ट्रिज लि. (ठाणे), ॲटलस एक्सपोर्ट (मुंबई), बीडीएच इंडस्ट्रिज (मुंबई), डी डेकोर एक्सपोर्ट प्रा.लि. (पालघर), डिसन ॲग्रो टेक प्रा.लि. (धुळे), इलकॉम इंटरनॅशनल प्रा.लि. (कोल्हापूर), इलेक्ट्रोफोकस इलेक्ट्रिकल्स (मुंबई), ग्लोब कोट्यम (मुंबई), हिकल लि. (ठाणे), जैन इरिगेशन सिस्टिम लि. (जळगाव), जिलानी मरीन प्रॉडक्ट्स (रत्नागिरी), ज्योती स्टिल इंडस्ट्रिज (ठाणे), केन इंटरप्राईझेस प्रा.जि. (कोल्हापूर), कोहिनूर रोप्स प्रा.लि. (परभणी), कोह्लर पॉवर इंडिया प्रा.लि. (छत्रपती संभाजीनगर), लाहोटी ओव्हरसीज लि. (मुंबई), मोर्या इंडस्ट्रिज (कोल्हापूर), न्यूट्रिच फूड प्रा.लि. (कोल्हापूर), सहयोग एक्सपोर्ट प्रा.लि. (पालघर), श्री वेंकटेश फिलॅमेंट्स प्रा.लि. (सोलापूर), सिमोसिस इंटरनॅशनल (ठाणे), सुप्रिया लाईफ सायन्सेस लि. (रत्नागिरी), झेनिथ इंडस्ट्रियल रबर प्रॉडक्ट्स प्रा.लि. (ठाणे).




















