नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना ‘माझा गाव माझा अभिमानचे निवेदन..
कोपरगाव, दि.१४.( किशोर शेलार )
कोपरगाव नगर परिषद हद्दीतील कर्मवीर नगर ते खंदकनाला दरम्यान असलेल्या नाल्याचे आरसीसी बांधकाम करून दोन्ही बाजूंनी जॉगिंग ट्रॅक व सुशोभीकरण करावे, अशी मागणी “माझा गाव माझा अभिमान कोपरगाव” यांच्या वतीने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर नाल्यात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असून अनेक घरांमध्ये पाणी घुसून नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच नगर परिषदेकडून दरवर्षी लाखो रुपये नाला सफाईसाठी खर्च केले जातात. हा नाला सुमारे ८०० मीटर ते १ किलोमीटर लांबीचा असून तो आरसीसी करून उर्वरित जागेचे सुशोभीकरण व जॉगिंग ट्रॅक उभारल्यास नागरिकांच्या आरोग्यास चालना मिळेल व शहराच्या सौंदर्यात भर पडेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

याशिवाय जुना टाकळी नाका येथील मोठ्या चेंबरवर स्लॅब टाकून तो कायमस्वरूपी बंद करावा, रस्त्याचे रुंदीकरण करून त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशीही मागणी करण्यात आली आहे. असे निवेदन “माझा गाव माझा अभिमानचे विनय भगत, मयुर आव्हाड, विजय जाधव व अमित आढाव यांच्या स्वाक्षरीने प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे.




















