आईसमोरच पाण्यात पडून दोघांचा मृत्यू; परिसरात शोककळा
कोपरगाव, दि.१५ : दीपक साटोटे
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसरे शिवारात दगडाच्या खाणीत साठलेल्या खोल पाण्यात पडून सख्ख्या भाऊ–बहिणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दुपारी घडली. या अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये सार्थक गणपत बढे (१९) आणि सुरेखा गणपत बढे (१८), दोन्ही डाऊच खुर्द येथील रहिवासी, यांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोघेही आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी चांदेकसरे शिवारातील खाणीत आले होते. दुपारी ते पाण्याच्या काठावर मेंढ्या धुत असताना अचानक तोल जाऊन सरळ खोल पाण्यात पडले. आईच्या डोळ्यांसमोरच हा प्रकार घडला. तिने मदतीसाठी आरडाओरड केली, परंतु तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पंचनामा करून मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत. या आकस्मिक मृत्यूमुळे डाऊच खुर्द व चांदेकसरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




















