पास्कल कॉलनी, शंकरवाडी, कोळीवाडा, हरीनगरसह अनेक वस्त्यांतील नागरिकांचा संताप उफाळला…
मुंबई, दि.१७ : मंगेश म्हात्रे
जोगेश्वरी (पूर्व) परिसरातील एसआरए प्रकल्प अर्धवट अवस्थेत सोडून दिल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन हाल वाढले आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या तक्रारी, पत्रव्यवहार आणि लक्षवेधक प्रयत्नांना प्रशासनाचा ‘उडवा-उडवीचा पवित्रा’ कायम असल्याचा आरोप करत भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)तर्फे आज, मंगळवार १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता एसआरए कार्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
पास्कल कॉलनी, शंकरवाडी, कोळीवाडा प्लॉट, बांद्रा प्लॉट, अंधेरी प्लॉट, हरीनगर आणि शिवाजी नगर रामगड परिसरातील हजारो रहिवाशांना अर्धवट बांधकामामुळे गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चौथ्या मजल्यापर्यंत सांडपाणी साचले असून परिसरात डास, माशा आणि आरोग्यास अपायकारक कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असताना प्रशासन मात्र ‘जबाबदारी झटकण्याच्या’ भूमिकेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जोगेश्वरी शाखेच्या नेतृत्वात निघणाऱ्या या आक्रोश मोर्च्यात शेकडो पुरुष‐महिला सहभागी होणार आहेत. नागरिकांच्या तातडीच्या प्रश्नांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, एसआरए कामे त्वरित मार्गी लावावीत आणि आरोग्यधोका रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पक्षाने केली आहे.
या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा सचिव शैलेन्द्र कांबळे, जोगेश्वरी शाखा सचिव अॅंथोंनी ग्रॅब्रियल, तसेच प. उपनगर तालुका सचिव चंद्रकांत बोजगर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.




















