मुंबई, दि. ७ : अजय मगरे
दिव्यांग व्यक्तींसाठी योजनांची माहिती मिळवणे आणि तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने अभिनव पाऊल उचलले आहे. विभागाकडून एआय-आधारित व्हॉट्सअॅप चॅटबॉट 7821922775 हा क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच तक्रार नोंदवणे हे आता “एका क्लिकवर” शक्य झाले आहे, अशी माहिती विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.
मुंढे म्हणाले, “या चॅटबॉटमध्ये ‘भाषिणी’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे टाईप करणे कठीण असलेल्या व्यक्ती आता फक्त व्हॉईस नोटद्वारे — मराठी किंवा इंग्रजी भाषेत — आपली तक्रार सहज नोंदवू शकतात.”
या सेवेच्या माध्यमातून तक्रारींची ‘सेल्फ ट्रॅकिंग’ सुविधा उपलब्ध असून, तक्रारीची सद्यस्थिती थेट व्हॉट्सअॅपवर पाहता येईल. शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत हा चॅटबॉट विकसित करण्यात आला असून तो अत्याधुनिक एआय मॉडेलवर आधारित आहे.
हे मॉडेल वापरकर्त्याची भाषा, संदर्भ आणि तक्रारीचा विषय ओळखून त्याचे स्वयंचलित वर्गीकरण करते आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवते.
तक्रारीवर संबंधित अधिकाऱ्यांनी २४ तासांच्या आत कारवाई सुरू करणे बंधनकारक आहे. तसेच पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखण्यासाठी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. विभागाकडून दर आठवड्याला सर्व तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे,” असे मुंढे यांनी सांगितले.




















