कोपरगाव,दि.२९. ( दिपक सासोटे )
कोपरगाव तालुक्यातील नगर–मनमाड महामार्गावर येवला नाका परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मृत तरुणाचे नाव आदित्य कैलास देवकर (वय 29, रा. 13 बंगले, इंदिरापथ, कोपरगाव) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य देवकर हे आपल्या दुचाकीवरून नगर–मनमाड रोडने जात असताना रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खोल खड्डा लक्षात आला नाही. दुचाकीचा तोल गेल्याने गाडी खड्यात आदळली आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. या अपघातात आदित्य यांचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्यावर पुरेशा स्ट्रीट लाइटचा अभाव आणि मोठमोठे खड्डे हे अपघाताचे मुख्य कारण ठरले आहे.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी महामार्ग विभागाने तातडीने रस्ता दुरुस्त करून प्रकाश व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी केली आहे.




















