म्हाडा निष्क्रिय, राजकारण सक्रिय – रहिवासी अस्वस्थ..
मुंबई, दि. २१ : मंगेश म्हात्रे
सायनच्या प्रतीक्षा नगर संक्रमण शिबिरात म्हाडाच्या चार मजली इमारतीच्या तळमजल्यावरील जमीन खचल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. इमारत क्र. टी- २२ मधील दोन खोल्यांमध्ये अचानक खड्डा पडल्याने भीतीचे सावट पसरले असून पिलरला गेलेले तडे, भिंतींना पडलेल्या भेगा आणि खचलेल्या जमिनीसह इमारतीचा पाया धोकादायक झाल्याची शंका व्यक्त होत आहे




गेल्या कित्येक वर्षा पासून या इमारतींमध्ये कुटुंबे राहत आहेत मात्र सुरुवातीपासूनच दर्जाहीन बांधकाम, दलदलीवर योग्य भराव न घालता उभारलेले बांधकाम यामुळे आज रहिवाशांचे आयुष्य धोक्यात आले आहे. “म्हाडाने घर दिलं की मृत्यूचा सापळा?” असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला.
जमीन खचल्याच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. महायुती, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे आमनेसामने आले आहेत.
प्रतीक्षा नगरातील नागरिकांना पावसाळ्यात गळक्या भिंती, पिलरला गेलेले तडे आणि आता जमिनीत खड्डे अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. “म्हाडा गप्प, राजकारण तापलेलं… मग आमच्या डोक्यावर लटकलेलं संकट कोण दूर करणार?” असा थेट सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
घटनेनंतर पुन्हा एकदा म्हाडाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा मुद्दा गाजू लागला आहे. प्रशासन आता ठोस उपाययोजना करेल का की पुन्हा फक्त मलमपट्टी करून विषय झाकण्याचा प्रयत्न होईल, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.




















