विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश; तंत्रज्ञानाधारित नियोजनावर भर
मुंबई, दि.३ : अजय मगरे
राज्यातील सर्व प्रगतीशील विकास प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात तसेच नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या ‘पायाभूत सुविधा वॉर रूम’ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातील सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ‘बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना केली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्प जून २०२९, वरळी प्रकल्प मे २०२९, आणि एन.एम. जोशी मार्गावरील प्रकल्प जून २०३१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
त्याचबरोबर ठाणे–बोरिवली दुहेरी बोगदा, उत्तन–विरार सी लिंक, आणि ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह शहरी बोगदा या प्रकल्पांचे वेळेत पूर्णत्वासाठी संबंधित यंत्रणांना सूचना करण्यात आल्या. ऐरोली–कटई नाका फ्रीवे प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ २० मिनिटांवर येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
वांद्रे–वर्सोवा सी लिंक प्रकल्पाची गती समाधानकारक नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी कामे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गतीमान करण्याचे आदेश दिले.
तसेच, मान–हिंजेवाडी–शिवाजीनगर मेट्रो लाईन ३, वडपे–ठाणे रस्ता, आणि मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पही निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
फिल्म सिटी ते खिंडीपाडा (मुलुंड) दुहेरी बोगदा, तसेच वर्सोवा–दहिसर–भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पांना नव्या गतीने पुढे नेण्यासाठी मंजुरी प्रक्रियेत गती आणण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
शेवटी, महावितरण, जलसंपदा आणि सिडकोमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यातील विकास हा लोकांच्या अपेक्षांनुसार आणि वेळेत पूर्ण होईल, यासाठी शासन कटिबद्ध आहे.”




















