१ निवासी व ८ अनिवासी झोपडीधारकांचे निष्कासन
मुंबई, दि.१३ : मंगेश म्हात्रे
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत सायन कोळीवाडा परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. श्री साई संजोग आणि एकता तसेच सिमरन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे असहकार्य करणाऱ्या १ निवासी व ८ अनिवासी झोपडीधारकांचे निष्कासन करण्यात आले.
ही कारवाई भू. क्र. ८९(पै) आणि २/८९(पै), सॉल्ट पॅन डिव्हिजन, जे. के. भासिन मार्ग, पंजाबी कॉलनी, जीटीबी नगर या परिसरात पार पडली. झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियमातील कलम ३३/३८ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.या कारवाईदरम्यान उपजिल्हाधिकारी (विशेष कक्ष) वंदना गेवराईकर यांच्या उपस्थितीत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी वर्गाने समन्वयाने ही कारवाई पूर्ण केली.
संपूर्ण कारवाई शांततेत आणि शासकीय नियमांचे पालन करून पार पडल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई संबंधित एसआरए योजनेच्या पुढील टप्प्यासाठी आवश्यक असून, उर्वरित अतिक्रमणांवरही पुढील कारवाई केली जाणार आहे.




















