नियमित पाणीपट्टी भरूनही नळ कोरडेच…
ठाणे,दि.१०.( अजय मगरे )
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, नळाला पाणी येत नसल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अंबिका नगरमधील पंचशील चाळ, भैय्यासाहेब आंबेडकर चाळ, भीम गर्जना चाळ या परिसरांना पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. ठाणे महापालिकेच्या जलपुरवठा विभागाच्या निष्क्रियतेचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, परिसरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
नागरिकांकडून नियमितपणे पाणीपट्टी भरली जात असतानाही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जलपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
अनेक भागांमध्ये आठवड्यातून एखाद-दोन वेळाच पाणी मिळत असून, पाण्यासाठी महिलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या चाळीत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
“पाणी नाही, पण बिल मात्र वेळेवर हवे!” अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात असून महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महापालिकेने तात्काळ दखल न घेतल्यास येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. प्रशासन जबाबदारी झटकत आहे का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
याविषयी बहुजन शक्ती न्यूज शी बोलताना वागळे प्रभाग समितीचे उप अभियंता माधव जांगडे यांनी सांगितले की, “अंबिका नगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन पाणी लाईन टाकण्यात येणार असून, लवकरच ही समस्या मार्गी लागेल.”




















