यादीची पुनर्तपासणी व्हावी – ॲड. राजेंद्र कोरडे
मुंबई, दि.२४ ( मंगेश म्हात्रे )
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गणेश नगर, मेघवाडी परिसरातील झोपडीधारकांची पात्र-अपात्र यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये ५३५ झोपडीधारकांची नावे (प्रारूप परिशिष्ट २) नमूद असून, त्यातील फक्त २२८ झोपडीधारक पात्र ठरले आहेत. म्हणजेच ७५ टक्क्यांहून अधिक झोपडीधारक अपात्र ठरले असून, यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या २२८ पात्रांमध्ये वर्ष २०००ते २०११ दरम्यानचे ‘सशुल्क पुनर्वसनास पात्र’ झोपडीधारकांचा समावेश आहे. मात्र, या वर्गातील झोपडीधारकांना प्रकल्प धोरणानुसार धारावीबाहेरील ठिकाणी ३०० चौरस फुटांचे घर २ लाख ५० हजार रुपये भरून मिळणार आहे. परिणामी, प्रत्यक्ष धारावीतील पुनर्वसन घरे मिळणाऱ्यांची संख्या केवळ १०० ते १२५ एवढीच राहणार असल्याचे स्पष्ट होते.
धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. राजेंद्र कोरडे यांनी या यादीवर तीव्र आक्षेप घेत म्हणाले, “ही यादी म्हणजे धारावीकरांना त्यांच्या मूळ परिसरातून हुसकावून लावण्याचा सरकारचा डाव आहे. झोपडीधारकांना अपात्र ठरवून त्यांची वसाहतच बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो पूर्णपणे अन्यायकारक आहे.”
स्थानिक नागरिकांनीही हा निर्णय अन्यायकारक ठरवत त्याविरोधात लवकरच आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुनर्विकास प्रक्रियेतील पारदर्शकता आणि न्याय्यतेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून, शासनाने या यादीची पुनर्तपासणी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.




















