मुंबई : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करून सामाजिक क्रांतीचा एल्गार पुकारलेल्या महाड येथील ऐतिहासिक क्रांतीभूमीची आज दुरवस्था झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक परिवर्तनाचा इतिहास घडवणाऱ्या या पवित्र भूमीकडे प्रशासनाने अक्षरशः पाठ फिरवल्याचा सदर ठिकाणी पाहणी केल्याचे दिसून येते.
क्रांतीभूमी परिसरात अद्याप संरक्षणात्मक कंपाऊंड वॉल उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरात गुरेढोरे मुक्तपणे फिरत असून मैदानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस होत आहे. परिसरात स्वच्छतेचा पूर्णतः अभाव दिसून येत असून ऐतिहासिक स्थळाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर संरक्षणासाठी छत्री नसल्याने उन्हाळा व पावसाळ्यात पुतळ्याची हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाड येथील क्रांतीभूमीवरील क्रांतीस्तंभाला ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो अनुयायांसमवेत मनुस्मृतीचे जाहीर दहन करून स्त्रिया आणि दलित-बहुजन समाजावरील अन्यायाविरोधात ऐतिहासिक लढा उभारला होता. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मूल्यांसाठी झालेला हा संघर्ष भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील क्रांतिकारी टप्पा मानला जातो.
दलितांच्या मानवी हक्कांसाठी झालेल्या महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला हा क्रांतीस्तंभ तब्बल ५१ फूट उंच असून त्याच्या तळाशी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या स्थळाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.
मात्र, अशा प्रेरणादायी आणि पवित्र स्थळाची होत असलेली उपेक्षा पाहून अभिवादनासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. क्रांतीभूमी परिसराचे संवर्धन, संरक्षण भिंत उभारणी, नियमित स्वच्छता आणि मूलभूत सुविधांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली असून ही मागणी बहुजन शक्ती सामाजिक संस्थेकडून करण्यात येत आहे.




















