बायोमेट्रिक नोंद न केल्यास संक्रमण शिबिरातून हकालपट्टी…
मुंबई, दि. २९ ( मंगेश म्हात्रे )
म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळानं संक्रमण शिबिरातील असहकार करणाऱ्या रहिवाश्यांना अखेरचा स्पष्ट इशारा दिला आहे, बायोमेट्रिक सर्वेक्षण करा, अन्यथा सामान बांधा! मंडळाच्या अखत्यारीतील सर्व संक्रमण शिबिरांमधील भाडेकरू आणि रहिवाशांनी तातडीने बायोमेट्रिक नोंदणी करावी, अन्यथा त्यांना अधिकृत घुसखोर घोषित करून थेट निष्कासनाची कारवाई केली जाणार आहे!
म्हाडाच्या स्पष्ट केले आहे की, जे रहिवासी बायोमेट्रिक सर्वेक्षणात सहभागी होणार नाहीत, त्यांच्या नावावर कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसतील किंवा वास्तव्याची इच्छा नसल्याचं समजून त्यांना घुसखोर ठरवलं जाईल. अशा व्यक्तींवर म्हाडा अधिनियम १९७६ मधील कलम ९५ (अ) (३) नुसार थेट हकालपट्टीची कारवाई करण्यात येईल.
या निर्णयामुळे संक्रमण शिबिरांमध्ये रहाणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. काहींनी आधीच बायोमेट्रिक नोंदणी सुरू केली असली, तरी अनेकांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. “कारवाई टाळायची असेल तर बायोमेट्रिक करा,” असा थेट इशारा म्हाडाकडून देण्यात आला आहे.
म्हाडाने सर्व पात्र रहिवाशांना आवाहन केलं आहे की, आपल्या पुनर्वसनाच्या हक्कावर गदा येऊ नये, यासाठी त्यांनी तातडीने सर्वेक्षणात सहभागी व्हावं. अन्यथा नंतर पश्चात्ताप करून काही उपयोग नाही, हे लक्षात ठेवावं.
शहरात जागेचा तुटवडा, गगनाला भिडणाऱ्या इमारती आणि शेकडो कुटुंबांचं पुनर्वसन या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हाडाचं हे पाऊल निर्णायक ठरणार आहे.
आता रहिवाश्यांकडे ‘नोंद करा वा निघा’, एवढाच पर्याय शिल्लक! असेल असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात येते.




















