मुंबई दि.२० ( प्रतिनिधी )
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) झोपडपट्टी पुनर्विकास क्षेत्रात मोठा मैलाचा दगड ठरू शकणाऱ्या रमाबाई आंबेडकर नगर प्रकल्पाला बँक ऑफ महाराष्ट्रकडून ₹१५०० कोटींचा कर्जपुरवठा मंजूर झाला आहे. घाटकोपर येथील रमाबाई नगर आणि कामराज नगर पुनर्विकासासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. हा एमएमआरडीएच्या ५० वर्षांच्या इतिहासातील पहिलाच थेट पुनर्विकास प्रकल्प असून एकूण ₹८४९८ कोटी खर्चाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा तो एक महत्त्वाचा भाग आहे.
या प्रकल्पामुळे हजारो कुटुंबांना सुसज्ज घरे, सुरक्षित व टिकाऊ परिसर, तसेच उज्ज्वल भविष्यासाठी संधी उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या प्रकल्पाचे आर्थिक संधारण आता अधिक मजबूत झाले आहे.
प्रकल्पाच्या निधी संकलनासाठी एमएमआरडीएने धोरणात्मक पावले उचलली असून, ₹३९१६ कोटी संस्थात्मक कर्ज आणि ₹३३१७ कोटी अंतर्गत महसुलातून उभारण्याचे नियोजन केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रकडून मिळालेला ₹१५०० कोटींचा पहिला टप्पा हे या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “हा प्रकल्प म्हणजे फक्त पुनर्विकास नाही, तर मुंबईच्या झोपडपट्टीवासीयांच्या जीवनमानात आमूलाग्र सुधारणा घडवणारा क्रांतिकारी टप्पा आहे.”
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “हा प्रकल्प हजारो नागरिकांना आत्मविश्वास, सुरक्षितता आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नवे दालन खुले करणार आहे.”
एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले की, “रमाबाई नगर प्रकल्प हा एमएमआरडीएचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श नमुना असून, आर्थिक शिस्त आणि लोककेंद्रित नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी दर्शवणारा आहे.”




















