कोपरगाव : दिलीप गायकवाड
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे काम करून केवळ बिले उकळण्याचा प्रकार सुरू असून, यामागे संबंधित ठेकेदार व स्थानिक लोकप्रतिनिधींचे संगनमत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय लाड यांनी केला आहे.
नगरसेवक यांच्या प्रभागात सुरू असलेल्या ठेकेदार यांच्या अंतर्गत हे काम सुरू असलेल्या या कामात सराफ बाजारातील अरुण बागुल ज्वेलर्ससमोरील जुने गटार अरुंद करून नूतनीकरण केले जात असल्याबाबत नागरिकांनी आक्षेप नोंदवला आहे. पहिल्याच पावसात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. असे असतानाही पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल, अशी कोणतीही प्रभावी उपाययोजना न करता केवळ उथळ खोदकाम करून नळ्या टाकल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांनी विरोध करूनही चिखलातच नळ्या दाबण्यात आल्या असून, सध्या गटार चेंबर व काँक्रीटचे ठापे टाकून धातुरमातुर काम सुरू असल्याचे लाड यांनी सांगितले. हे बांधकाम मोठ्या पावसात टिकणार नसून भविष्यात अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या कामाबाबत ठेकेदार व संबंधितांकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे न देता उद्धटपणाची भाषा वापरण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या कामामुळे व्यापारी, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि दोषींना जबाबदार धरावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय लाड यांनी केली आहे.




















