पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : अजय मगरे
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला तसेच पुणे रिंगरोडच्या पूर्व विस्तारीकरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
२५ किमीचा मेट्रो मार्ग; १६ स्थानके
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या मेट्रो-१३ प्रकल्पाची अंमलबजावणी एमएमआरडीएमार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १७ हजार ७२४.९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, मार्गाची एकूण लांबी २५.०३ किमी असेल. त्यापैकी २१.७८ किमी मार्ग उन्नत, तर ३.२५ किमी मार्ग भूमिगत असेल. मार्गावर १३ उन्नत आणि तीन भूमिगत अशी एकूण १६ स्थानके प्रस्तावित आहेत.
या प्रकल्पात वसई खाडीवरील पांजू बेटाला जोडण्यासाठी ४.९२ किमी लांबीचा सहापदरी रस्ता आणि मेट्रोचा संयुक्त पूल उभारण्याचे नियोजन आहे. चिखल डोंगरी येथे मेट्रो डेपो प्रस्तावित असून, मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसर या मार्गाने जोडले जाणार आहेत.
रेल्वे स्थानकांशी जोडणी
मेट्रो-१३ मार्ग नायगाव, नालासोपारा आणि विरार उपनगरी रेल्वे स्थानकांशी जोडला जाणार आहे. मेट्रो मार्ग क्रमांक ९ सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे जोडणी प्रस्तावित आहे. सर्व मेट्रो स्थानकांवर बससेवा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
प्रकल्पासाठी सुमारे २४.८४ हेक्टर भूसंपादन अपेक्षित असून, मंजुरीनंतर पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. येत्या सहा महिन्यांत भूसंपादन आणि पोहोच मार्गांची कामे सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
दररोज साडेचार लाख प्रवाशांचा अंदाज
२०३१ मध्ये मेट्रो-१३ मार्गावर दररोज सुमारे ४.४९ लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. मेट्रोमुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत प्रवासाचा वेळ सुमारे ५० टक्क्यांनी कमी होणार असून, खासगी वाहनांचा वापर आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनातही घट होणार आहे.
वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि मुंबई उपनगरांसवह औद्योगिक व लॉजिस्टिक केंद्रांची जोडणी अधिक सक्षम होऊन या संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणालाही मंजुरी
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे रिंगरोडच्या सोरतापवाडी ते वरवे-शिवरे मार्गाच्या पूर्व विस्तारीकरणालाही पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली. या मार्गामुळे शहरातील जड वाहतूक बाहेरून वळविण्यास मदत होऊन पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.




















