काँग्रेस जनहित याचिका दाखल करणार
ठाणे, दि.२३ : अजय मगरे
ठाण्यातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा वेळी सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोची गाजावाजा करत घेतलेली चाचणी ही वाहतूक उपाययोजना नसून ‘निवडणुकीची चाचपणी’ असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २०१२ मध्ये भूमिगत मेट्रोची घोषणा झाली होती. मात्र चार-चार डेडलाइन उलटूनही प्रकल्प पूर्ण न झाल्याने कामे रखडलेलीच आहेत. स्टेशन, कारशेड, परवानग्या अपूर्ण असताना फक्त श्रेय घेण्यासाठी चाचणी दाखवली जात आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, घोडबंदर सेवा रस्ता विलीनीकरणावरही काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या कामामुळे वाहतुकीला अधिक अडथळा निर्माण होणार असून नागरिकांचा विश्वास न घेता होत असलेले काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा डिसेंबरअखेर मेट्रो सुरू करण्याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध न झाल्यास काँग्रेस जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा देण्यात आला.




















