धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीवाला धोका; पुनर्विकासाची गरज तातडीची
मुंबई, दि.१० : मंगेश म्हात्रे
अंधेरी (पूर्व) येथील म्हाडाच्या पीएमजीपी कॉलनीतील इमारत क्रमांक ६/३९ मध्ये आज सकाळी भीषण घटना घडली. घराचे छत अचानक कोसळल्याने एका महिलेला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी तातडीने महिलेचा बचाव करून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
सुदैवाने इतर कोणतीही जीवितहानी टळली असली तरी, या घटनेमुळे वसाहतीतील इमारतींच्या धोकादायक स्थितीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. पीएमजीपी कॉलनीतील बहुतेक इमारती जर्जर अवस्थेत असून, छताचा भाग, भिंतींना तडे, प्लास्टर निघणे आणि स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
रहिवाशांनी अनेक वेळा म्हाडा प्रशासनाकडे पुनर्विकासाची मागणी केली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही.
“दररोज भीतीच्या सावटाखाली राहतोय. कधी छत कोसळेल याची शाश्वती नाही,” असे एका रहिवाशाने संताप व्यक्त केला.
या घटनेनंतर म्हाडा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, रहिवाशांनी तातडीने पुनर्विकासाचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे.




















