पणती रंगविणे, आकाशकंदील बनविण्यात घेतला उत्साहाने सहभाग…
मुंबई, दि. १८, आनंता मोटे
दिवाळी म्हणजे केवळ दिवे, फटाके आणि सजावट नव्हे, तर माणुसकी, प्रेम आणि एकोप्याचा उत्सव आहे, या भावनेतून पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमात त्यांनी मुलांसोबत पणत्या रंगविल्या, आकाशकंदील तयार केले आणि चित्रकला उपक्रमात सहभाग घेतला.
हा कार्यक्रम केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि द चिल्ड्रन्स एड सोसायटी फॉर अंडरप्रिव्हिलेज्ड किड्स ऑर्फनेज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आधुनिक कला दालन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी उपस्थित होत्या.
या निमित्ताने बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “ही मुलं कोणत्या जाती-धर्माची आहेत हे महत्त्वाचं नाही; ती माणसाची आहेत. त्यांच्या डोळ्यांतील आनंद हा समाजासाठी प्रेरणादायी आहे. असा समाज घडला पाहिजे, जिथे प्रत्येक माणूस स्वतःची ओळख स्वतः निर्माण करेल.”
पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करताना त्या म्हणाल्या, “आपण ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळून निसर्गाशी सुसंगत अशी दिवाळी साजरी करूया.” पर्यावरण विभागाने यासाठी समाजमाध्यमांद्वारे विशेष जनजागृती मोहीम हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रसिद्ध कलाकार ए. ए. अल्मेलकर यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे तसेच आकाशकंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे उद्घाटन केले. अनाथ मुलांसोबतच्या या आनंदमय क्षणांनी दिवाळीचा उत्सव अधिक उजळून निघाला.




















